अजिंक्य शिंदें करणार सीजेपी आंदोलनाचे नेतृत्व , अभिजित दिपकेंचा आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल ....

Foto
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली पोलिसांनी विमानात शिरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ताब्यात घेतले जाताच अभिजित दिपके यांचा एक पूर्वमुद्रित व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.वृत्तपत्रे वाचा

"हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ मला, आशुतोष रांका आणि सौरव दास या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आमच्या अटकेनंतर आता आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्या हाती असतील. तेच या देशव्यापी लढ्याचे नेतृत्व करतील," अशी अधिकृत घोषणा दिपके यांनी या व्हिडिओद्वारे केली आहे.

"आता आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंच्या खांद्यावर" – अभिजित दिपके
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिजित दिपके यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना शांत राहून लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. "सर्वांना नमस्ते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ आम्हाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आमची मागणी थांबणार नाही. आमच्यानंतर अजिंक्य शिंदे हे या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करतील. जे नागरिक आणि कार्यकर्ते या लढ्यात सोबत आहेत, त्यांनी अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा पुढे न्यावा."

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी तिन्ही नेत्यांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले असून तिघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहेत अजिंक्य शिंदे?
मूळचे महाराष्ट्रातील अलिबाग येथील असलेले अजिंक्य शिंदे हे सध्या कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन प्रभारी आहेत. अभिजित दिपके आणि अजिंक्य शिंदे यांची पहिली भेट २०१६ मध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही सामाजिक आणि राजकीय मोहिमांमध्ये एकत्र काम करत आहेत. अजिंक्य शिंदे यांनी चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक आणि राजकीय चळवळीत स्वतःला झोकून दिले. यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाच्या गोवा आणि महाराष्ट्र युनिटमध्ये सोशल मीडिया आणि संघटनात्मक बांधणीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.शहर शोधा

मुंबईतील शिवाजी पार्क आंदोलनाचे आयोजक
मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनाच्या आयोजनात आणि रणनीतीमध्ये अजिंक्य शिंदे यांची मुख्य भूमिका होती.

'नेतृत्व असो वा नसो, लढा सुरूच राहील' – CJP चे स्पष्टीकरण
पक्षाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटले आहे की, सरकारने आणि पोलिसांनी दडपशाहीची कितीही परिसीमा गाठली, तरी आंदोलन थांबणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित गैरव्यवहार, मतदार यादीतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेली ही लढाई देशव्यापी पातळीवर पुढे नेली जाईल, असा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.